उत्कृष्ट निर्मितीचा ध्यास- रोल्स रॉइस

प्रस्तुत लेख लोकसत्ता ड्राईव्ह इट मध्ये दिनांक १० जानेवारी २०१३ ला प्रकाशित झाला होता.

गेल्या कित्येक वर्षात तंत्रज्ञान झापाझप पावले टाकत कुठल्या कुठे गेले आहे. समाजाच्या गरजा, बदलत्या काळाने घातलेल्या मर्यादा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, ग्राहकांची बदलती आवड आणि मानसिकता या सर्वांनी वाहन निर्मिती क्षेत्रात कल्पना न करण्यासारखे बदल घडवून आणले आहेत. कित्येक अवाढव्य कार निर्मिती करणाऱ्या कंपन्या काळाच्या ओघात नाश पावल्या आणि कितीतरी नवोदित कंपन्यांनी मात्र फार कमी कालावधीत मोठा ग्राहक वर्ग जमवला आहे. या सर्व चढाओढीच्या आणि चंद्राच्या कलेसारख्या बदलणाऱ्या बाजारपेठेत अनेक वर्षे तग धरून राहणे हि फार मोठी आणि मानाची गोष्ट आहे. जेव्हा बाजारपेठ लोकांना खुश ठेवणाऱ्या आणि कालानुरूप बदलणाऱ्या वाहनांनी भरलेली असते, तेव्हा स्वतःच्या विचारांना, कल्पनांना धक्का न लावता तग धरून राहणे फार अवघड असते. हि सर्व आव्हाने पेलणारी रोल्स- रॉइस कंपनी हि खऱ्या अर्थाने आपला ग्राहक वर्ग टिकवण्यास समर्थ ठरलेली कंपनी आहे.

इतर गाड्यांमध्ये आणि रोल्स-रॉइस कंपनीच्या गाड्यांमध्ये काही मुलभूत फरक आहेत. बाजारात आढळणाऱ्या इतर सर्व गाड्या या यंत्रांद्वारे फार मोठ्या प्रमाणावर उत्पादित केल्या आहेत. कित्येक कार निर्मिती करणाऱ्या कंपन्या आज दिवसाला शेकडो गाड्या लीलया बनवितात. या उलट, रोल्स रॉइस कंपनीची एक कार बनायला दोन महिने लागतात.रोल्स-रॉइस चा वेगळेपणा हा आहे कि त्यांची प्रत्येक गाडी हि अजूनही माणसाच्या हातांनी साकारलेली आहे; केवळ निर्जीव यंत्राने नव्हे. बाजारपेठ अधिकाधिक स्पर्धात्मक होत आहे. कार उत्पादक कंपन्या एक-एक क्षण कसा वाया जाणार नाही या करिता प्रयत्न करीत असताना दिसतात. उत्पादन कालावधी कमी करण्याकरिता विविध यंत्रांचा अधिकाधिक वापर आज सर्वत्र होतो आहे. सर्व कंपन्यांकडून अवलंबिला हा धोपट मार्ग सोडून आणि बाजारातील स्पर्धा इत्यादी सर्व आव्हानांना धुडकावून लावत रोल्स-रॉइस आज हि कार निर्मितीच्या प्रत्येक पायरीवर कुशल मनुष्य बळ वापरते आहे. गाडीच्या आतील सुबक इंटेरियर असो वा डॅशबोर्ड चे अत्यंत सुबक लाकडाचे काम. रोल्स-रॉइस या सर्व कामांकरिता कला-कौशल्याने ओतप्रोत भरलेल्या मानवी कारागिरांचा वापर करते. या गाड्यांचे कित्येक भाग हे माणसांनी कुठलेही यंत्र (साधी मोजायची पट्टी सुद्धा नाही!) न वापरता बनवलेले असतात. जगात ज्या कुठल्या गाड्या सर्वात जास्त चर्चिल्या जातात, त्यात नक्कीच रोल्स-रॉइस चा क्रमांक सर्वात वर लागेल.

असा विचार कोणाच्याही मनात येऊ शकतो, कि यंत्र- रोबोट्स इत्यादींचा वापर करून विविध कंपन्या गाड्या बनवीत असताना रोल्स-रॉइस कंपनीच्या मनुष्य निर्मित गाड्यांचा दर्जा काय? पण गमतीची गोष्ट अशी आहे कि या कंपनीच्या स्थापनेपासून आज पर्यंत जितक्या गाड्या विकल्या गेल्या आहेत, त्यातल्या ६५ % गाड्या आजही रस्त्यांवरून अत्यंत दिमाखाने धावत आहेत. सामान्य गाड्या या मशीन निर्मित असल्या, तरी त्यांत १०-१२ रंगांहून अधिक रंग उपलब्ध नाहीत. रोल्स-रॉइस च्या ग्राहकांना निवडण्या करिता शंभर दोनशे नव्हे तर तब्बल ४४,००० रंगछटा उपलब्ध आहेत. गाडीचा सर्वात महत्वाचा भाग, थोडक्यात सांगायचे झाले तर गाडीचा आत्मा असतो तिचे इंजिन. रोल्स-रॉइस कंपनीच्या प्रत्येक गाडीचे इंजिन हे आजही मानवी हातांनी साकारलेले आहे. गाडीला दिमाखदार आणि रुबाबदार रूप देणाऱ्या दर्शनी भागातील रेडीयेटर जाळ्या कुठल्याही साधनांच्या वापर न करता केवळ मानवी हात आणि डोळ्यांचे कौशल्य यांचा वापर करून बनविल्या जातात. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांची आणि उमरावांची रोल्स-रॉइस मिळवण्याची धडपड कदाचित याच सर्व कारणांमुळे असावी. रोल्स-रॉइस कार हि प्रत्येक मालकाला त्याच्या आवडीनुसार बनवून मिळते. गमतीचा भाग असा, कि फक्त भरपूर पैसे असले तर तुम्ही या कारचे मालक होऊ शकाल याची अजिबात शाश्वती नाही. एक काळअसा होता कि कितीही पैसे असले तरीही समाजात विशिष्ट मनाचे स्थान असणार्या लोकांनाच या गाडीचे मालक होता यायचे.  loksatta1

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर पासून मायकल जॅकसन पर्यंत सर्वांना या गाडीच्या सौंदर्याने आणि डौलदार रूपाने भुरळ घातली होती.कित्येक उमरावांच्या रोल्स-रॉइस गाड्या या त्यांच्या दिवाळखोरीत विकण्यात आल्या. आचार्य रजनीश अर्थात ओशो यांच्या कडे असणाऱ्या रोल्स-रॉइस गाड्यांची संख्या त्या काळात नव्वद च्या वर होती. भारतात आजही अमिताभ बच्चन सारखे सिनेकलाकार व थेट विजय मल्ल्यांसारखे उद्योजक रोल्स-रॉइस वापरणाऱ्यात मोडतात. आज वेग, इंजिनची क्षमता ई. निकषांवर रोल्स-रॉइस ला पुरेपूर सामना देणाऱ्या गाड्या आहेत. कित्येक गाड्यांचे रूप हे रोल्स-रॉइस च्या तुलनेत अत्यंत आधुनिक आणि चित्तवेधक आहे. तरीदेखील, रोल्स-रॉइस ची सर दुसऱ्या कुठल्याही गाडीला नाही.या गाडीचा राजेशाही रुबाब, डोळ्यांना रोखून ठेवणारे वेधक रंग, संथ, संयमित पण आत दाटलेल्या असीमित उर्जेची जाणीवकरून देणारी चाल  दुसऱ्या गाडीला लाभणे फार दुर्मिळ. अर्थातच, या गाडीची किंमत देखील तिच्यासारखीच भारदस्त आहे. ‘किंमत विसरल्यानंतर देखील कित्येक वर्षे गुणवत्ता लक्षात राहते’ हे रोल्स-रॉइस कंपनीच्या संस्थापकांपैकी एक, सर हेन्री रोल्स यांना याबाबत विचारणा केली असताना त्यांनी दिलेले उत्तर या बाबतीत फारच बोलके आहे. कदाचित या गाडीच्या कणा-कणांत तिची निर्मिती करणाऱ्या, कलेच्या उत्कृष्ट आविष्काराचा ध्यास बाळगणाऱ्या कुशल कारागिरांचे श्वास गुंफल्या गेले असावेत…

-मंदार कारंजकर

Comments

Leave a Reply