कबीर त्याच्या गुरूंकडे गेला.
कबीर ‘एन्लायटन’ झाला.
कबीर त्याच्या गुहेत गुडुप्प झाला.
बुद्ध निर्वाण अवस्थेच्या शोधात वणवण भटकला.
बुद्ध निर्वाणावस्थेला उपलब्ध झाला.
बुद्ध एका घनदाट अरण्यात लुप्त झाला.
वरील दोन्ही घटनांच्या पहिल्या दोन ओळी सत्य आहेत. वरील दोन्ही घटनांमधील तिसरी ओळ मात्र धादांत खोटी आहे.
कबीर गुहेत नाही जाऊन बसलेत. त्यांनी थेट बाजाराच्या मध्ये उभं राहून डरकाळी फोडली – कबीर खडा बजार में, लिये लुकाठी हात.
असं म्हणतात की निर्वाणावस्थेनंतर बुद्धांना स्वर्गाच्या दारावर नेण्यात आलं. स्वर्गाच्या आतील मंडळी दारावर एक उतावळी थाप पडेल असं गृहीत धरून होती. सर्वांची धडपड मोक्षासाठी असते. बुद्ध मोक्षात प्रवेश करण्यासाठी आतुर असतील अशी आतील मंडळीची धारणा. परंतु दारावर थाप पडलीच नाही. गांगरलेल्या स्वर्गातील कर्मचाऱ्याने स्वतःच दार उघडले. दार उघडून पाहतो तर काय! बुद्ध मोक्षाकडे पाठ करून उभे.
“आत नाही यायचं का तुम्हाला? इथे प्रवेश घेण्यासाठी लोक अनेक जन्म पणाला लावतात.” इति कर्मचारी.
कर्मचाऱ्याचे हे शब्द बुद्धांच्या कानावर पडले. परंतु, बुद्धांना इतरांना त्यांच्या दुःखावस्थेत सोडून मोक्षात प्रवेश घेण्यात रस नव्हता.
ज्ञान माणसाला अलिप्त करते, अगम्य करते असं आपल्याला सतत सांगण्यात येतं. परंतु, इतिहासाचा अभ्यास केला तर लक्षात येतं की ज्ञानी मंडळी अविरतपणे झटत होती.
बुद्ध आणि कबीर सोडा, तुकाराम, रामकृष्ण परमहंस आणि अगदी जवळचं उदाहरण घ्यायचं झालं तर कृष्णमूर्ती आणि निसर्गदत्त महाराज देखील सदैव लोक-प्रबोधनच करत होते. निसर्गदत्त महाराजांना आणि रामकृष्ण परमहंसांना तर गळ्याचा कर्करोग होता तरीदेखील त्यांनी बोलणे थांबवले नाही.
वास्तविकता अशी असताना आपण ज्ञानाचा संबंध अलिप्त होणे किंवा ‘रेक्लूज’ होणे याच्याशी का जोडतो?
अलिप्तपणा आणि ज्ञानाची गाठ घालून आपण आपल्या कलांची, साधनेच्या विविध शाखांची अपरिमित हानी करीत आहोत.
अगदी साधे उदाहरण – वीस ते तीस वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या छोट्या गावांमध्ये उत्तम दर्जाचे गाणं सादर करू शकणारी लोकं होती. आज त्या दर्जाची कला सादर करणारे पुण्यात आणि मुंबईत देखील हातावर मोजण्याएवढे लोकं आहेत. थोड्याफार फरकाने साहित्य, चित्र, नाटक, शिल्प आणि अन्य कलांची साधारण अशीच अवस्था आहे. कला सोडा, विविध ‘क्राफ्ट्स’ची देखील अवस्था बिकट आहे. सुतारकाम, गवंडीकाम, बागकाम उत्तम करू शकणाऱ्या लोकांची संख्या निश्चितच खालावली आहे.
या खालावत जाणाऱ्या आलेखाचे कारण कुठेतरी सोयीस्कररीत्या किंवा परिस्थितीमुळे ओढलेल्या अलिप्ततेच्या पांघरुणात असेल का? कोणावर टीका करणे किंवा उगाच भावना दुखावणे हा या लिखाणाचा हेतू नसून काय चुकते आहे ते समजून घेण्याचा आणि त्या दिशेने काही विचार मांडण्याचा प्रामाणिक हेतू आहे. माझा प्रांत गाण्याचा. त्यामुळे त्या क्षेत्रातील माझ्या काही नोंदी मी खाली मांडतो आहे.
काही दशकांपूर्वी उत्तम दर्जाचे गायक छोट्या शहरांमध्ये आणि अगदी खेड्यांमध्ये जाऊन कार्यक्रम करायचे. या कार्यक्रमाचे आर्थिक गणित जेमतेमच असायचे परंतु मोठ्या शहरातील किंवा परदेशांतील दौरे देखील काही खूप नसायचे त्यामुळे रिकामं बसण्यापेक्षा कलाकार लोकं हे छोटेखानी कार्यक्रम करायचे. आता अशा कार्यक्रमांचं प्रमाण खूप कमी झालं आहे. या कार्यक्रमांमुळे होणाऱ्या सर्वंकष फायद्यांचा विचार करणे आवश्यक आहे.
१. श्रोत्यांना उत्तम दर्जाचं संगीत ऐकायला मिळायचं. नकळत त्यांचे कान तयार व्हायचे.
२. स्थानिक कलाकारांना अव्वल दर्जाचे कलाकार कला कशी सादर करतात, रियाझ कसा करतात हे थोडक्यात का होईना, अनुभवता यायचं आणि त्याचा त्यांच्या साधनेवर निश्चितच परिणाम होत असणार.
३. या स्थानिक कलाकारांची मुलं, शिष्य यांना देखील बाहेरून येणाऱ्या कलाकारांच्या सहवासाचा फायदा व्हायचा. माझे गुरुजी पंडित विजय सरदेशमुख यांना पंडित कुमार गंधर्वांच्या गाण्याची ओढ अशा कार्यक्रमांमुळेच लागली आणि त्यामुळेच ते त्यांचे शिष्य झाले. छोट्या गावात देखील अशा प्रकारे अव्वल कलाकारांना शिष्य किंवा किमान सांस्कारक्षम तरुण गायक/गायिका /वादक मिळत असणार.
४. गावात मोठे कलाकार आले की ते स्थानिक कलाकारांचं गाणं ऐकायचे.
कल्पना करा. माझ्या गावात जर वर्षातून एकदा पंडित भमसेन जोशी येत असतील आणि ते जर मला ‘ऐकव काहीतरी’ म्हणत असतील तर त्याचं कितीमोठं दडपण आणि जबाबदारी माझ्यावर येणार आणि तिचा माझ्या गाण्याच्या दर्जावर किती परिणाम होणार!
मोठे कलाकार छोट्या गावी जाणे थांबल्याने किंवा कमी झाल्याने वरवर वाटते त्यापेक्षा खूप खोलवर कलांची हानी होत आहे. आधी उल्लेख केल्याप्रमाणे हीच परिस्थिती थोड्याफार फरकाने इतर कलांची देखील असणार. यावर तोडगा काय? कलाकारांना जबरदस्तीने छोट्या गावांत पाठवणे?
मला वाटतं की हा प्रश्न जबरदस्तीने नाही तर संवेदनशीलतेने सुटू शकतो. कसा?
दोन उदाहरणे तुमच्यासमोर मांडणार आहे. या दोन उदाहरणांतून अनेक गोष्टींचा उलगडा होईल. एक उदाहरण गाण्याच्या क्षेत्रातील आहे आणि दुसरे नाटक क्षेत्रातील.
टी. एम. क्रिष्णा आज कर्नाटकी अभिजात संगीतातील एक अव्वल कलाकार. काही आठवड्यांपूर्वी त्यांनी फेसबुक आणि इंस्टाग्राम वर पोस्ट टाकली – मला लोकांच्या घरी येऊन गाणे ऐकवायचे आहे. पैस्याची अपेक्षा नाही. सोबत साथीदार किंवा अन्य काही लवाजमा नाही. फक्त यायची-जायची आणि राहायची सोय करा. मी येईन आणि तुमच्या घरी गाऊन जाईन. आम्ही स्वतः आमच्या एका मित्र-मैत्रिणीच्या घरी अशी एक बैठक ऐकून आलो. कुठलेच सोपस्कार नाहीत. फक्त गाणं आणि गप्पा.
टी. एम. ची राजकीय व सामाजिक विषयांवरची मते सर्वांनाच पटायला हवी असं नाही. परंतु फुकाचा अलिप्तपणा न पांघरता ते ज्या पद्धतीने त्यांची विचारधारा आणि त्यांचं गाणं पुढे नेत आहेत, ते अभ्यासण्यासारखं आणि अनुकरणीय आहे.

दुसरं उदाहरण म्हणजे दिग्दर्शक आणि लेखक अतुल पेठे यांच्या रंग-संगत कार्यशाळा आणि त्यांची प्रायोगिक नाटके.
दिवसेंदिवस नाटक करणे कठीण होतं चाललं आहे, नाटकापुढे अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत हे आपण अनेक वर्षे ऐकतो आहोत. पण करायचं काय?
अतुल पेठेंनी देखील काही महिन्यांपूर्वी फेसबुक आणि इंस्टाग्राम वर पोस्ट टाकली. उत्तम नाटक करायची इच्छा आहे? कुठल्याही मोबदल्याच्या अपेक्षेविना आम्ही येऊ आणि नाटकाची कार्यशाळा करू. शहरांतून, खेड्यांतून आणि पाड्यांतून लोकांचा प्रतिसाद आला. अतुल पेठे, अभिनेता ओंकार गोवर्धन आणि डॉक्टर दीपक मांडे हि मंडळी गावोगावी जाऊन हि दोन दिवसांची कार्यशाळा घेताहेत. मागील दोन कार्यशाळांमध्ये दाक्षायणी आणि मी देखील शामिल झालो.

‘कोणाला काही पडली नाही आहे’, ‘उत्तम कलेची कोणाला जाण नाही आणि कदर नाही’ , ‘फार कमी लोकांना खरी कला कळते’ हि अलिप्तवादी मंडळीद्वारा सतत पुढे केली जाणारी कारणे किती पोकळ आहेत हे या कार्यशाळा पाहिल्यावर कळले. लोकांना जाणून घ्यायचं आहे. त्यांना देखील त्यांची अभिरुची वर न्यायची आहे. त्यांच्यासमोर देखील त्यांच्या समस्या आहेत. त्याची देखील लिमिटेशन्स आहेत. परंतु, त्यांच्यात प्रज्वलित होण्याची शक्यता आहे. ती शक्यता होती म्हणूनच बुद्धांनी मोक्षाकडे पाठ केली आणि कबीर बाजारात ठाण मांडून बसले.
नाकर्तेपणाची किंमत फार मोठी असते. आजचा नाकर्तेपणा अनेक कला लुप्त होण्यास निशचितच कारणीभूत ठरू शकतो. थोरांनी उठून, त्यांचे अलिप्तपणाचे धोरण बाजूला ठेवावे. ती खरी कलेची सेवा ठरेल.
Leave a Reply