हे पृष्ठ आहे कवितेकरिता…..काव्यात अमाप ताकत आहे…अनुभूत गोष्टी अभिव्यक्त करण्याची…हे पृष्ठ समर्पित आहे याच अभिव्यक्तीला……..ही आयुष्याची कविता मांडायचा हा एक प्रयत्न…..
* गीत तुझ्या प्रेमाचे…
गीत तुझ्या प्रेमाचे, स्फुरू दे अंतरी माझ्या,
तुझ्या प्राणांनी प्रफुल्लित व्हाव्या ज्योती मम जीवाच्या
या जीवनाचा अर्थ नवा तू व्हावा,
तुज्या प्रेमाचा मिळावा मज विसावा
अंतरीचे मैत्र हे, ही एक नवी दिशा,
क्षणा-क्षणाकरिता झुरत होतो मी अशा
हा दीप पेटला अंतरी, नव्हे अंधाराची भिती
श्रद्धेची ही ज्योत, आता अनंत तेवती….
ही वात जाळून जावी, उर्व फक्त प्रकाश
अन् दिसून जावे मज, अंतरीचे आकाश…..
* तू प्रकाशी जा सखे…..
तव प्रेमाचे गीत गाता गाता हरवून बसलो गीत माझे
प्रेमाच्या मखमली पावलांनी रक्तांकित काळीज माझे
शब्दांचे या अर्थ सारे विसरुनी मी आज बसलो
प्रेमाच्या मंजूळ तारांत नकळत अन अलगदच फसलो
संवेदनाही झाल्यात बोथट अन कवडीमोल त्या भावना
प्रेममय या जगात, व्हावी प्रेमाची अशी अवहेलना?
अवहेलनेचे दुक्ख नाही, नको जराही सहानुभूती
खंत एकाच लागे जीवासी, का का हि अप्रीती?
जुळवुनी तारा मैत्राच्या गीत प्रेमाचे छेडिले
भिजवुनी अश्रूंत काळीज अनुबंध जोडीले
मज ओढ नाही तुझ्या केसांची,नाही रस ओठांत
झुरतो मी बघण्याकरता मला तुझ्या नेत्रांत
तुझ्या नेत्रांत हरवून जातो शोध स्वतःचा घेता घेता
तुझ्या प्रेमात भिजुनी जातो आडोसा स्वतःचा घेता घेता
हे प्रेम नव्हे गीत दोघांचे, यात दिसला मज परमात्मा एक
सार्या विश्वात विखुरलेला प्रेमाचा रंग एक…..
जाळूनी काळीज माझे तू केलेत उपकार अनंत
बोकाळलेल्या कल्लोळानंतर आता सारे शांत शांत
अर्थशून्य सारे आता शून्यवत विश्व अवघे
घोर तिमिरी मी जरी फसलो,तू प्रकाशी जा सखे……
* रे विहंगा…..
रे विहंगा, चल दाखवतो
या विश्वाचे रूप खरे
खाली दाटले दैन्याचे डोह
वर वित्ताचे उंच झरे….
वरून दिसले तुला विहंगा
जगताचे या रूप साजरे
परी तळाशी या जगतात
न कुणा कुणाची लाज रे
जो सत्याची वाट चालतो
तो इथे हमखास मरे,
रे विहंगा चल दाखवतो
या विश्वाचे रूप खरे…….
धर्म हाच अधर्म जाहला
अधर्म हाच धर्म
फळाची आशा प्रत्येकाला
नको कराया कर्म
दांभिकता मुरली ज्याच्या अंगी,
लक्ष्मीही त्यालाच वरे,
रे विहंगा चल दाखवतो
या विश्वाचे रूप खरे…….
* कथा एका पर्णाची…..
झाडावरूनी विलग झाले शुष्क-पर्ण एक
संगे सोबतीस आला वाऱ्याचा तो वेग
धरुनी हात वरूणाचा निघाला भ्रमंतीस विश्वाच्या
वीट आला होता निरस आयुश्याचा तयाच्या
घे संगे मज मित्र वरुणा करू दोघे विश्व-भ्रमंती
बघू मौज जरा या विश्वाची मिळेल थोडी शांती
थांब जरा विचार कर अन नको पुरवू माझा पिच्छा
या नियतीचा मी श्वास येथे सारी माझीच इच्छा
कधी चालतो कधी थांबतो ना कसलीही शाश्वती
तुझ्या इच्छा पूर्ण करणे नाही माझी नीती
मी जाईल तेथे तू येणे
इथे नको तुझे गाऱ्हाणे
मम हात दिला तव हाती आता कसली भती?
जिथे जाशील तेथे घेऊन चल कर एवढी प्रीती
निघाले दोन मित्र कराया विश्वाची सफर
अचंबित ते पर्ण बिचारे पाहून समोर हिमशिखर
त्या तिथे मज चल घेऊन मित्रा कर हि इच्छा पूर्ण
आयुष्य अख्खे झाडावर घालवलेले मी गरीब पर्ण
आधीच वदलो तुला मी मित्रा,येथे नसे इच्छा तुझी
तुला वणव्यात सोडण्याची मी करेन इच्छा पुरी माझी
तव बुंधा सोडला तू आता तू माझा दास
सामर्थ्य शाली या वाऱ्याने गिळला तुझा घास
ऐक कथा हि तुझी मानवा नकोस सोडू बुंधा आत्म-स्मरणाचा
पर्णासम्मान जळून जाशील काय अर्थ मग शोक करण्याचा??
* दु:ख दे पालका….
विकल असहाय्य कोणी करी धावा त्याचा
धावत अन तो आला पुसाया हाल लेकराचा
विकल असहाय्य कोणी करी धावा त्याचा
धावत अन तो आला पुसाया हाल लेकराचा
दु:खच दु:ख निर्मिले देवा न दिसतसे कवडसा सुखाचा
झुरण्याकरिता का दिला तू हा जन्म मज फुकाचा?
दोन बिंदू तरळले कष्टी परमेश्वराच्या नेत्री
काय तुझ हवे लेकरा? दे कळू मला तरी
धन्य तू परमेश्वरा धन्य रे तुझी लीला
कितीसे लागणार या मज पामराला?
धन दे अमाप दे सुंदर दारा
सुखांचा पडू दे पायाशी पसारा
होवू दे सुखाचा एक एक क्षण
नको मज दु:खाचा किंचितसाही कण
बस इतके तुझे मागणे? करतो क्षणात पूर्ण
बस झाले आता लेकरा तुझं हे झुरणं
ऐसे बोलुनी निघून गेला विश्वाचा करता
थकून गेलेला तो बिचारा सुखाचे घास भरता भरता
परत त्याला हाक आली त्याच लेकराची
किती क्रूर थट्टा तू केली रे लेकराची
होते नव्हते सर्व दिले आता काय उरले बालका?
ढसढसून रडायचे आहे,दु:ख दे पालका…
Leave a Reply