मि दिवसभर वाट बघत असतो खोलीत शिरायची.कधी एकदा आत जातो असे होऊन जाते. माझी खोली काही खूप सुंदर, अलिशान, टापटीप आहे असे अजिबात नाही. पण या खोलीत काहीतरी आहे जे कुठेच नाही. पाखरं घरट्यात येतात तसा मि या खोलीत येतो. पाखरे अंधारात गडप होतात, अन् मि उजेडात. पण माझी खोली घरट्यापेक्षा कित्येक अर्थांनी अधिक अर्थपूर्ण आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास माझ्या खोलीला दार आहे. ते बंद करून मि नको त्या गोष्टी लीलया थोपवून धरतो.
आज मात्र मि उत्तर शोधायचचअ असं ठरवल आहे. काय आहे या खोलीत? विराट वृक्षांप्रमाणे उन्मळून पडलेल्या बासऱ्या. माझं श्वास आणि त्यांचं श्वास हल्ली एकाच होऊन बसलेला आहे. त्या निर्जीव वेणूंच दर्शन होताच बोटांत जीव येतो. श्वासाला भरती येते. तिला गुंफलेला ओशो चा लोलक आपोआप चैतन्याने हलू लागतो. कधी करून चारुकेशी साद घालते तर कधी केदार कारंज्यासारखा उसळून येतो. मग तास दीड तास लाटा येतात आणि जातात. मि उसळतो आणि जागच्याजागी स्थिर असतो. या लाटा कुठल्यातरी प्रवाहात एकरूप करून टाकतात.
दार उघडून बाहेर आलो, कि पाण्यात डुंबून बाहेर आलो कि जसं जड वाटतं, तसं जड वाटू लागतं. मि परत आत जातो. बाहेर नकोच राहायला. माझ्या खोलीतल्या असंख्य पुस्तकांवारचे ओशो चे चेहरे मला असंख्य गोष्टी सांगतात. खरं सांगायचा झालं तर ते सगळे एकाच गोष्ट सांगत असतात. हा पुस्तकांचा ढीग मला फार आवडतो. त्यात अजिबात शिस्तबद्धता नाही. हेच त्याचं सौंदर्य असावं.
माझी खोली सदैव खुली आहे…ओशो, हरिप्रसाद, शिवकुमार, जसराज, घालिब, खुस्रो-खय्याम करिता…त्यांना बाहेर जायचं रस्ता मात्र अजिबात नाही. कदाचित त्यांना देखील इथून बाहेर जायची इच्छा होत नसावी.
माझ्या खोलीत शिवकुमार शर्मांनी विणलेलं हंसध्वनी चं जाल असतं. अतिशय तलम आणि तितकंच अदृश्य.या लाटा अजून मोठ्या असतात. कदाचित माझ्या खोलीत त्या अजून मोठ्या होत असाव्यात. तहान लागते, मि दाराकडे येतो. हंसध्वनी मंद होऊ लागते. मि दारातच थबकतो…..पाणी कधीही आणि कुठेही मिळेल….या लाटा कुठे मिळायच्या?
Leave a Reply