हाक अद्वैताची

प्रश्नातच दडले उत्तर आयुष्याचे तू काय पुसिशी ते ठरवि आयुष्य तयाचे

थांब जरा शांत अन् मग पहा,  तव चरणी दडले मर्म सकल विश्वाचे

 

सुदिन आज हा प्रश्न मजला पडला,  कोण मी, कुठून देह हा जडला

किटकाचे जीणे आता उरले नाही विश्व चैतन्याचा ध्यास मजला जडला

 

कित्येक येती अन् जाती जगती जीव कुणा कुणाची अन् का करावी कीव?

स्वार्थ बिंदू मागे जो तो धावी, आंधळेपणा हा प्रत्येकाचा अतीव.

 

ससा धावितो गजराच्या मागे जैसे पतंग ते दिव्याच्या मागे

सोड वासना थांब जरा  अन् हृदयी तव प्रेम निरंजन लागे

 

मानवाच्या गर्वाची काय सांगावी गाथा हृदयास सतत रोखून धरे माथा

गर्वाचे जीणे काय हो जिणे बघ जरा हृदयातील अपुल्या वाटा

 

प्रश्न पडता गहन आयुष्याचा उभा ठाकला पुढे व्याप विश्व्वाचा

मला न मी कधी जाणले केला नुसता दिखावा याचा त्याचा

 

खय्याम ची वारुणी  कोणी अल बिरूनी

यांच्या आयुष्याची,  ऐकून न ऐकली कहाणी

 

खय्याम ची वारुणी  पिलो ओशोंचा संभोग करुनी थकलो

वासना भरती पोट त्यांचे मी तर कोरडाच करपलो

 

कृष्णाची ठरवली व्यर्थ मी वाणी मीरेची घालवली वाया गाणी

एकेक महात्मा धुळीस मिळवला मी गातो गर्वाची गाणी

 

मज बुद्धाचे दिसते औदासिन्य  मी म्हणतो हा पळपुटा अनन्य

कुठे फेडावे हे पाप मी? बुद्धाच्या चरणीच होईन मी धन्य

 

आज पेटली ही आग अंतरी माझ्या  मनी फुलल्या प्रेम कालिका सुकुमार ताज्या

ओढ आज मज मम जीवाची लागे वाटे मनी जावे त्या त्याच्या राज्या

 

कुठवर जगावे मृताचे ते जिणे? असावे हो थोडे चैतन्याशी देणे घेणे

ही उर्मी स्वतःस शोधायची  बदलवणार दिसतेय माझे जिणे

 

आज बसतो मी शांत निश्चल ऐसा न दिसतसे मला घर दारा अन् पैसा

पाण्यात अडकता श्वास गुदमरतो जीव  थयथयाट माझा आज होतो तैसा

 

मी थांबलो अन् जग हे धावतची आहे  कुठे जायचे हे नं कोणास ठावे

मज अंतरीचा रस्ता कोणता हो? म्हंटले आज जरा स्वतःसच पुसावे.

 

अंतरीचा रस्ता दुर्लभ असे फार पाहून न बघण्याची सवयच झाली पार

आत एक ज्योत प्रकाशाची अन् बाहेर…..अंधार अंधार

 

ओली काटकी पेटत असता  धुर सर्वत्र होतो पसरता

तैसे आज दोष माझे व्यापुनी टाकती असमंता

 

अंतरीची धुनी पेटता मायेस माझ्या होती वेदना

धुराच्या अन् पैलतीरी शांत शांत ती चेतना

 

अंतरीचा हा धरता रस्ता  मज संवेदनेस बसती खस्ता

आज अन् मग मला उमगे.. हा सौदा नसे सस्ता

 

पण आज अनामिक ओढ उरी… भरण्यास मी तयार किंमत पुरी

फरक नं पडे या देहास.. भूवरी मी उरी वा न उरी.

 

एकेक वासना ओरडते कानी अरे गाढवा काय हे करिसी मनानी?

चल तुजला जिंकून जग मी देते.. मिटव ही अंतरीची धुनी

 

हा अंतरीचा शोध कसला ? ह्या वाटेवरचा हरेक यात्री फसला

काढ हे खूळ तू मूर्खा मनातुनी तव चरणी बघ हा सागर सुखाचा वसला

 

अरे उच्च शिक्शिताच्या पोरा बघ ही तुझ्या घरची परंपरा

तूच एक मुर्ख यातला.. कान न देखील तव खाती वारा

 

बघ ते नेत्र तव पित्याचे… शोकाळलेले हृदय मातेचे..

किती दुक्ख होणार त्यांना पाहुनी भ्रष्ट पोर तयांचे

 

तुज कवटाळून छातीशी  बापाने गाठली चाळीशी

अन् या खुळा पायी तू  मिळवशी स्वप्न त्याचे धुळीशी

 

थांबलो मी क्षणभर जरासा सोडूनी मी दीर्घ उसासा

कधी घ्यावा मग मी हा शोध अंतरीचा?

 

थोर असो ती परंपरा  नं रुचे माझ्या अंतरा

मी केवळ एक विद्रोही  अन् हो, वेडा थोडा जरा

 

हा रस्ता नव्हे शहाण्यांचा हा मक्ता वेड्या विक्शिप्तांचा

हिशोबाची आवड असणार्यांनो, हा नव्हेच प्रांत तुमचा..

 

केवळ घेण्यासाठी देणे तुमचे परोप्कारातही स्वार्थच उमगे

निष्काम देण्याची मजा, आज मम अंतरात तुम्बे

 

कोण देतो या जगी कुणाला हा तर भावनिक खेळ सगळा

इथला हरेक हरेक भिकारी कारभार ‘त्याच्या’ हाती सगळा

 

बाप अमुचा देता झाला प्रेमे सर्व करता झाला

पण उरी हा ओढा विलक्षण न उमगे त्या बापुडयाला

 

आज दिसे मज बुद्ध निराळा मायेचे पाश कापुनी पळाला

दु:ख हो ते एका बापाचे अन् लाखोंना प्रकाश मिळाला

 

किंवा आठवा ते रजनीश चिंतनात मग्न अहर्निश

जर केली असती परिवाराची चिंता कैसा प्रकटला असता ईश?

 

आता थांबणे नाही शक्य ही हाक निनादते तीव्र अतर्क्य

माफ करा मज जर मी चुकलो पण मला पुकारीते अद्वैत ते ऐक्य

 

 

 

 

 

 

 

 

Comments

Leave a Reply