आपणास कोणतीही गोष्ट साधायची असल्यास तिला वेळ लागणारच. घरून ऑफिसमध्ये जाणे, स्वयंपाक करणे, झाडांना पाणी देणे इत्यादी इत्यादी. कुठलेही काम असो, त्याला निश्चितच वेळ लागणार. परंतु, वेळेचा हाच नियम आपल्या आंतरिक जगात सुद्धा लागू होतो का? याचे एक अगदीच सोपे उदाहरण म्हणजे, एका स्थळाहून दुसऱ्या स्थळी जायला जसा वेळ लागतो तसाच वेळ मला (कोणाही एका व्यक्तीला) हिंसकतेपासून अहिंसकतेकडे जाण्यासाठी लागेल का? किंवा, आपण म्हणतो कि वासना सोडण्यासाठी वेळ लागेल. आंतरिक विश्वात ‘वेळ’ या कल्पनेला अस्तित्व आहे का? आंतरिक बदलास वेळेची अजिबात गरज नाही असे धाडसी विधान कृष्णमूर्ती करतात.
गेली हजारो वर्षे आपले सिव्हिलायझेशन (संस्कृती) पुढारते आहे, सुधारते आहे असे आपण म्हणतो. आपली दळणवळणाची साधने, वैद्यकीय सुविधा, संभाषणाची माध्यमं, आयुष्याचा दर्जा इत्यादी अनेक गोष्टी सुधारल्या आहेत. परंतु, या सर्व गोष्टी बाह्य जगतातील आहेत. आपल्या आंतरिक जगात खरंच काही बदल झाला आहे का? माणूस आज देखील तितकाच हिंसक, इन्सिक्युअर, आणि अप्पलपोटी आहे. थोडक्यात, हजारो वर्षांच्या काळात बाह्य जगात बरेच परिवर्तन झाले असले तरीदेखील आतील जगात आपण शून्य पाऊले चाललो आहोत.
आंतरिक बदल हा काळ सापेक्ष नाही आहे. हिंसकतेकडून अहिंसकतेकडचा प्रवास हा केवळ क्षणार्धात होऊ शकतो; नाही तर तो अनेक जन्मांत देखील होऊ शकणार नाही. आपण सर्वजण स्वतःला पुरेपूर ओळखतो. आपल्यातील अनेक गोष्टी आपल्याला बदलवाव्याशा वाटतात. परंतु, आपण त्यांना बदलायला थोडा वेळ लागेल हे गृहीत धरतो आणि हीच आपली घोडचूक.
परंतु यावर उपाय काय?
हीच कृष्णमूर्तींची गंमत आहे. ते कधीच उपाय सांगत नाही. सत्याच्या बोध होणं हाच असत्यावरचा उपाय. अजून कोणताही उपाय गरजेचा नाही.