जे. कृष्णमूर्ती (जिद्दू कृष्णमूर्ती/Jiddu Krishnamurti) म्हणजे विसाव्या शतकात होऊन गेलेले एक अनोखे संत. त्यांची राहणी आणि वागणे अत्यंत साधे असले तरी देखील ते ‘सोकॉल्ड’ संतांच्या अजिबात जवळ जाणारे नव्हते. आपण अनेक संतांना ‘जगद्गुरू’ संबोधतो. खरंतर, कृष्णमूर्तींचा संदेश हा खऱ्या अर्थाने वैश्विक होता आणि आपल्या नव्वद वर्षांच्या आयुष्यात त्यांनी तो अथकपणे जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन मांडला.
कृष्णमूर्तींच्या पूर्ण आयुष्यात अनेक चमत्कार आणि रहस्यमय गोष्टी घडल्या; ज्याचा वापर त्यांनी केला असता तर त्यांच्या भक्तमंडळींची संख्या इतर सर्व संत/गुरूंच्या वर गेली असती. परंतु कृष्णमूर्ती आयुष्यभर प्रेम, निसर्ग, मानवी भावना, सवयी, स्वार्थीपणा, अशा साध्या परंतु शाश्वत विषयांवर बोलत राहिले. माझ्या पिढीतील तरुणांनी कृष्णमूर्ती फारसे वाचले नाही आहेत. हेच काय, त्यातील अनेकांना या नावाची व्यक्ती आपल्या देशात होऊन गेली याची देखील माहिती नाही. ज्या लोकांनी कृष्णमूर्तींचे लिखाण वाचले, त्यातल्या अनेकांनी ‘ते फारच क्लिष्ट आहे’ या कारणामुळे वाचणे बंद केले. अनेक लोक कृष्णमूर्तींना पर्याय म्हणून ओशोंची पुस्तके वाचतात.
कृष्णमूर्तींचे सर्व लिखाण आणि त्यांची सर्व व्याख्याने इंग्लिश भाषेत आहेत. मराठीत त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झाले असतील; परंतु शब्दशः अनुवादात जिवंत गोष्टी निसटून जातात आणि उरते ती केवळ क्लिष्टता.
कृष्णमूर्तींचे लेखन आणि त्यांची व्याख्याने हि काही आपली ‘माहिती’ वाढविण्यास साहाय्य करीत नाही. ओशोंच्या लिखाणासारखे त्यात विनोद किंवा गोष्टी देखील नाहीत. त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कृष्णमूर्तींनी काही शाश्वत सत्य सातत्याने मांडली. त्यांच्या लिखाणांत हीच शाश्वत तत्वे सातत्याने दिसतात. मी प्रयत्न करणार आहे हि शाश्वत तत्वे किंवा मूलतत्त्वे अत्यंत सोप्या भाषेत तुमच्यासमोर मांडण्याचा.
मी अध्यात्मातील कोणी ‘ऍथॉरिटी’ नाही. कृष्णमूर्तींच्या लिखाणावर विवेचन करणे हा देखील माझा हेतू नाही. त्यांचे विचार माझ्यातच अजून चांगले झिरपावे म्हणून ते मी स्वतःसाठी इथे लिहितो आहे. ते वाचून कोणास काही फायदा झाला तर उत्तमच!