आपण सर्वच योजनाप्रिय आणि उपायप्रिय आहोत. कोणत्याही प्रश्नावर, समस्येवर काहीतरी उपाय असणार हा आपला समज. ओघानेच, हा उपाय कोणीतरी दुसऱ्याने द्यावा हि आपली अपेक्षा. धर्म, गुरु, पुस्तके, पुराण, मित्र, शिक्षक इत्यादी मंडळींनी आपल्या प्रश्नांवर बने-बनायें ‘रेडिमेड’ उपाय आपल्याला देत राहावे असे आपल्याला कायम वाटते. जे. कृष्णमूर्तींच्या या बाबतीतील विचार फारच वेगळा आहे.

आजार असल्यास वैद्याकडे जाणे किंवा गाडी बिघडल्यास मेकॅनिककडे जाणे प्राप्तच आहे. परंतु, आपल्या आंतरिक प्रश्नांची उत्तरे आपल्याला दुसरा कशी देणार? आणि, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आपला प्रयत्न देखील फसवा आहे. आपल्या राहत्या घराला (आपण आत असताना) जर का आग लागली, तर आपण चर्चा नाही करणार. आपण कृती करू. दारातून, खिडकीतून, जिथून शक्य असेल तिथून आपण बाहेर पडू. प्रश्नाचा जेव्हा आपल्याला बोध होतो, तेव्हा त्यातून उत्तर जन्माला नाही येत; त्यातून कृती जन्माला येते.

‘आग जाळते’ हा बोध झाल्यावर माणूस चुकूनही आगीशी खेळात नाही. आपण आयुष्यभर आपल्या वासना, असहिष्णुता, आपल्या आकांक्षा यांच्यासोबत झगडत असतो, त्यांच्यापासून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करत असतो. मुक्त होण्याचे मार्ग आणि उपाय अवलंबतो. आग जशी जाळते, तशीच आपली वासना देखील आपल्याला जाळते हा बोध मात्र आपणास झालेला नसतो. वासनेवर किंवा कुठल्याही समस्येवर उपाय शोधण्यापेक्षा आपण तिला पूर्णपणे समजून घेतले तर ती किती दाहक आहे हे उमजून आपण तिच्यापासून आपण मुक्त होऊन जाऊ. त्यासाठी वेगळा उपाय योजण्याची आवश्यकता नाही.

कृष्णमूर्ती स्पष्ट मार्ग/उपाय सांगत नाही हा अनेकांचा आरोप. कृष्णमूर्तींचा रस्ता फारच सरळ आहे. बोध होऊ द्या. बोध झाला कि तुम्हालाच उपाय गवसेल. आणि बाहेरून कोणीतरी थोपलेल्या उपायांपेक्षा हा आतून आलेला उपाय अधिक परिणामकारक असेल.

Share this: