
असो, तर या विषयाचा ऊहापोह करण्याचे कारण इतकेच की नव्या पिढीचे वाचन लेखन होतेय का, खरेच त्यात काही दखल घेण्याजोगे प्रयोग होताहेत का, ही मंडळी नेमके काय लिखाण करतात, पुस्तके लिहिताना यांना कोणते विषय भावतात, त्यासाठीचे संशोधन कसे केले जाते, वैयक्तिक लेखसंग्रहाचे पुस्तक होण्यासाठी काय काय करावे लागते, पुस्तकासाठी प्रकाशक गाठणे या प्रक्रियेकडे आजची पिढी कशी पाहते, त्यांना पुस्तक छापण्यासाठी प्रकाशकांकडून प्रतिसाद मिळतो का, या तपशीलात जाण्याची तसदी फारशी कुणी घेत नाही. पहिल्या पुस्तकासाठी प्रकाशकांचे उंबरठे झिजवणे, हा प्रकार नव्या पिढीने जवळपास हद्दपार केला आहे.
ब्लॉगच्या पर्यायाने; तसेच त्याला मिळणाऱ्या ऑनलाइन वाचकांच्या पर्यायाने पुस्तकांची खरोखरच गरज आहे, का असा प्रश्नही उपस्थित केला गेला; पण त्यामुळे पुस्तकाचे महत्त्व काही कमी झाले नाही. ऑनलाइन विश्वाने नवोदित लेखकांना जगभरातल्या ‘सेल्फ पब्लिशर्स’शी जोडले आहे. म्हणूनच एखाद्या पुस्तकाला प्रकाशक मिळो अथवा न मिळो, आपले भावविश्व आपल्याला हव्या तशा पद्धतीने मांडणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटते. ज्यांना प्रकाशक मिळाले त्यांनी चर्चा करून, आपले मुद्दे आणि लेखनामागची भूमिका पटवण्याचा प्रयत्न केला. ज्यांच्याशी संवाद जमू शकला नाही, तिथे त्यांनी भूमिका पटण्याच्या फंदात न पडता त्यांनी सेल्फ पब्लिशर्सचाच अवलंब केला. या सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे ही सगळी युवा मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत. कुणी कम्प्युटर सायन्स करणारे, कुणी जिल्हा आणि राज्य पातळीवरील खेळाडू तर कुणी पर्यावरण अभ्यासक. पुस्तक हा समान धागा. त्यामुळेच काही प्रातिनिधीक उदाहरणे घेऊन नव्या पिढीतल्या लेखकांचा, ज्यांचे लिखाण पुस्तक छापण्यापर्यंत पोहोचलेय, अशांशी संवाद साधून त्यांच्या उपक्रमांची दखल घेण्याचा हा प्रयत्न.
भारावलो आणि लिहित गेलो…
लेखनाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना कम्प्युटर इंजिनिअर असलेल्या सूरज बोराडे या युवकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘व्हिक्टरी ऑफ नेशन अॅण्ड मोदी’ हे शोधनिबंध स्वरूपातील पुस्तक लिहिले आहे. मोदींचे मार्केटिंग न करता युवकांच्या प्रबोधनासाठी हे पुस्तक केल्याचे तो सांगतो. सध्या तो हिंजवडी येथील ऑप्ट्रा टेक्नॉलॉजी इथे काम करतो आहे. एरवी लेखनाची कोणतीही पार्श्वभूमी त्याला नाही. हे पुस्तक लिहिताना केवळ मोदींवर स्तुतीसुमने उधळायची नाहीत हे सूरजने ठरवले होते. प्रकाशक शोधणे हे आव्हान होते. इंटरनेटवर त्याला कोलकत्याच्या ‘पॉवर पब्लिशर्स’ची माहिती मिळाली. पुस्तकासाठी लिहिलेले एक प्रकरण त्याने या प्रकाशकांना मेल केले. प्रकाशकांनी या पुस्तकात रस दाखवल्यावर पदरचे पैसे खर्च करून सूरजने हे पुस्तक छापले. पहिल्या टप्प्यात त्याने पुस्तकाच्या एक हजार प्रती छापून घेतल्या आहेत. हे पुस्तक लवकरच मराठीत आणण्याचा त्याचा मानस आहे. सूरज हा सोलापूर जिल्ह्यातल्या गाडेगावचा (ता. बार्शी) रहिवासी आहे. ‘मला पंतप्रधान मोदींचे मार्केटिंग करायचे नाही; पण सध्या युवकांसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मी हे पुस्तक लिहिले आहे,’ असेही तो सांगतो.
खेळ आणि लेखन घालवते ताणतणाव
प्रिता यादव… जिल्हा आणि राज्यपातळीवरची हॉकी खेळाडू. सध्या हिंजवडीतल्या टीसीएसमध्ये काम करतानाच तिनं शाळेत असतानाच केलेल्या कथेवर ‘क्लास’ नावाचं पुस्तक लिहिलं आहे. ही कथा स्पोर्ट्स स्कूलमध्ये दाखल होणाऱ्या जोलीन नावाच्या टीनेजर मुलीची आहे. एकंदरच स्वतःसह मैत्रिणींच्या अनुभवविश्वाचे धागे गुंफून तिने कादंबरी प्रकारात या पुस्तकाची रचना केली आहे. जोलीन हे मुख्य पात्र तिने मुलींच्या भावभावनांची सांगड घालत उभे केले आहे. जोलीनवर असणारा पालकांचा दबाव, तिचे स्वतःशी झगडणे, स्पोर्ट्स स्कूलमधील दिवस, खेळांविषयीची आवड आणि त्यातून तिने मास्टरीसाठी एका खेळाची निवड करणे इथपर्यंतचा प्रवास या पुस्तकात आहे. माणसाच्या आयुष्यात काहीतरी ध्येय हवे, असा संदेश प्रिताला या पुस्तकाच्या माध्यमातून द्यायचा आहे. प्रिता म्हणते, ‘या पुस्तकाचे पाच भाग मी लिहून ठेवले आहेत. माझ्यासाठी लिखाण ही सगळे ताणतणाव घालवणारी गोष्ट आहे. म्हणूनच मी लेखन करते. खेळात येणाऱ्या मुलींचे अनुभव मला सगळ्यांसमोर मांडायचे आहेत.’
प्रेमाची किंमत शोधणारा प्रवास
फेसबुक-ट्विटर वा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून जमणारे नाते, तासनतास चालणारे संवाद (चॅटिंग), या गदारोळात प्रेम महत्त्वाचे की शिक्षण, पदव्या आणि पैसा महत्त्वाचा की प्रियकराची साथ, पालकांचे ऐकायचे की मनाचे… अशा आजच्या पिढीसमोर ‘आ’वासून उभ्या असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधणारे आणि देणारेही ‘प्रेमाची किंमत काय..?’ हे पुस्तक मंदार कारंजकर आणि दाक्षायणी आठल्ये या दोघांनी लिहिले आहे. प्रेमकथा मांडताना त्यांनी एकंदर आजच्या युवकाला प्रेम करताना येणारा अनुभव, त्यातील गुंते, अडीअडचणी, करिअरचे प्रश्न याचाही वेध घ्यावा वाटला. त्याबाबत बोलताना मंदार म्हणतो, ‘गेली सात वर्षे मी अध्यात्म, संगीत अशा अनेक विषयांवर लिखाण करतो आहे. या ब्लॉगमुळे अनेक वृत्तपत्रांतही लिहिले. प्रेम, करिअर आणि घरच्यांशी असलेले संबंध या तिन्ही गोष्टी सांभाळणे हल्ली फारच कठीण होत आहे. या सर्व दडपणामुळे तरुणांचा गोंधळ उडतो आहे. माझ्या आणि दाक्षायणीच्या प्रेमकथेवर आधारित पुस्तक लिहून या विषयावर तरुणांना उपयुक्त अशी माहिती रंजक स्वरूपात देता येईल, असे आम्हा दोघांनाही कित्येक दिवस वाटत होते. ‘विश्वकर्मा प्रकाशन’च्या शारदा दुबे यांची आणि माझी एका सेमिनारमध्ये भेट झाली. आमचे कथानक त्यांना आवडले आणि पुस्तक साकारले. हल्ली प्रकाशन प्रक्रिया फारच सोपी झाली आहे. प्रकाशकदेखील नवीन लेखक, त्यांच्या नवीन कल्पना आणि कथा उत्साह दाखवून प्रकाशित करत आहेत.’
इतिहासाच्या आवडीतून लिखाणाकडे
तळेगाव-दाभाडे येथील प्रमोद बोराडे हा युवक इतिहासाची आवड असणारा. ऐतिहासिक कागदपत्रांचा धांडोळा घेत अभ्यासाचा छंद त्याने मर्यादित राहू दिला नाही. आंबी येथील डी. वाय. पाटील संस्थेत अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये तो सध्या काम करतो. गेली काही वर्षे उत्तर भारत आणि दक्षिण भारत अशी देशभ्रमंतीही त्याने केली. महाराष्ट्राच्या संस्कृतीत मोलाचे स्थान असणाऱ्या गडकोटांचा त्याचा विशेष अभ्यास. इतिहासासह तिथला निसर्ग, अधिवास यांचाही वेध तो घेत आहे. नुकतेच त्याने लोहगड-विसापूर या जोडगोळीपैकी विसापूर या गडावर ‘मावळची राजधानी ःदुर्ग विसापूर’ हे पुस्तक लिहिले आहे.
‘परकीय लोकांचा असा समज आहे की, सगळे तंत्रज्ञान त्यांनी भारतात आणले; पण स्थापत्य वगैरेतले प्रगत आधुनिक तंत्रज्ञान मावळातल्या गडकोटांवर सोळाव्या-सतराव्या शतकातच असल्याचे आज तिथले अवशेष सांगतात. आपले पूर्वज प्रगत होते. ब्रिटिश, पोर्तुगीज, डच यांनी आपल्या इतिहासाचे लेखन केले; पण त्यात भारतातले मागासलेपण ठळकपणे अधोरेखित केले गेले. मध्य किंवा प्राचीनयुगात भारतीय आणि महाराष्ट्रीय समाज विकसित झाला होता. आपण कोणापेक्षाही कमी नव्हतो. इथे छान संस्कृती नांदत होती, ती आजही अनेकांना माहिती नाही. म्हणूनच वास्तव समोर आणून नव्या पिढीला प्रेरित करण्याच्या हेतूने मी लिहीत आहे. मावळ तालुक्यातल्या इतर गडांवरही मी लिखाण करतो आहे.’ असे प्रमोद सांगतो.
पर्यावरण आणि जनजागृतीसाठी
फोटोग्राफीच्या छंद जोपासताना अनेकजण दिसतात; पण हाच छंद पर्यावरण आणि जनजागृतीसाठी वापरायचे ठरवून पुण्याच्याच अनीश परदेशी या युवकाने महाराष्ट्रातील सापांच्या २४ प्रजातींचा अभ्यास केला. त्यांची फोटोग्राफी केली. ही फोटोग्राफी करताना तो साप पाहणाऱ्याला पटकन ओळखू येईल, याची दक्षता घेतली. विशेष म्हणजे या अभ्यासावर न थांबता त्याचे पुस्तकही त्याने केले आहे. या पुस्तकात साप आणि त्याची माहिती त्याने दिली आहे. हा सगळा खटाटोप सापांना वाचवण्यासाठी केलेला आहे. या पुस्तकाला शहरी वाचक नाही मिळाले तरी चालतील; पण ग्रामीण भागात अधिकाधिक लोकांपर्यंत हे पुस्तक पोहोचवण्यासाठी तो धडपडतो आहे. ग्रामीण भागातील नागरिक वा शेतकऱ्यांच्या दिनक्रमात या प्रजातींशी संबंध येतो. साप दिसताच तो मारला जातो; पण पर्यावरणाच्या साखळीत सापांचे महत्त्व वेगळे आहे. हे पटवून देण्यासाठी अनीशने हा पुस्तकप्रपंच केला आहे. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ही पुस्तके तो ग्रामीण भागात पोहोचवणार आहे. नव्या वर्षात पुस्तकासह तो पाबे घाट परिसरातल्या गावांमध्ये सापांविषयीचा स्लाइड-शो करण्यासाठी जाणार आहे. आगामी काळात विंचवाच्या प्रजातींवर पुस्तक करायचा त्याचा विचार आहे. ‘पर्यावरण आणि जनजागृतीसाठी मी पुस्तक केले. त्यामुळे सापांचे आणि इतर वन्यजीवांचा प्राण वाचले तर मला आनंद वाटेल,’ अशी अनिशची भावना आहे.
Leave a Reply