आपण स्वतःहूनच ओढवून घेतलेली पण आपल्याला अजिबात न सोसवणारी आयुष्याची गती; आयुष्यात सतत अजून काहीतरी मिळवायचे आहे हे वेड, आयुष्याच्या परिपूर्णतेबद्दल असलेल्या किंबहुना लादलेल्या किंवा उसन्या घेतलेल्या मृत संकल्पना; या व अशा अनेक कारणांनी आपण आपले आयुष्य गचाळ आणि गलिच्छ करत चाललो आहोत. या सर्व गदारोळात ‘घर’ या संकल्पनेला किती महत्त्व उरणार? काचेच्या निर्जीव खिडक्यांनी बनलेल्या आणि एक तुसडेपणा निर्माण करणाऱ्या, गारठवणाऱ्या वातानुकूलित ऑफिसात अर्ध्याहून अधिक दिवस घालविल्यानंर घराबद्दल, त्यातल्या रंगसंगती आणि रेषांबद्दल, त्यात विराजमान झालेल्या अवकाशाबद्दल कोण विचार करणार?
घर हे केवळ चार भिंती नसून तो आपल्याला स्वतः बाहेरील व स्वतःतील अपरिमित अवकाशाशी जोडणारा दुवा आहे हा साक्षात्कार केवळ एका तासात घडविण्याची ‘किमया’ अतुल पेठेंनी केली. निमित्त होते प्रसिद्ध स्थापत्यकार माधव आचवल लिखित ‘किमया’ या पुस्तकाच्या अभिवाचनाचे. संकल्पना होती ज्येष्ठ नाटककार अतुल पेठे व सोलापूरचे अनुभवी स्थापत्यकार अमोल चाफळकर यांची. सादरकर्ते अतुल पेठे! अतिशय नव्या धाटणीच्या या प्रयोगाचे स्थळ होते अनुपमा कुंडू या अतिशय सिद्धहस्त स्थापत्यकर्तीने साकारलेले संवेदनशील चित्रपट दिग्दर्शक क्रांती कानडे यांचे घर. ज्याला आपण नेहमी दुय्यम लेखतो ते चार भिंतींचे घर आपल्याला, आपल्या भावविश्वाला किती हळुवारपणे स्पर्श करते याची जाणीव घराच्या अंगणात पाय ठेवताच झाली. मन्सूरांच्या गाण्याने स्वतःची एक वेगळी ‘स्पेस’ निर्माण केली होती. बघता बघता दिवाणखाना पूर्ण भरला. ठीक वेळेवर प्रयोगाला सुरुवात झाली.
पहिल्या काही क्षणांतच आचवलांचे एखाद्या चित्रकाराच्या लयबद्ध रेषांसारखे शब्द, पुस्तकातील मृत शब्दांना पुन्हा जिवंत करून संप्रेरित करणारे अतुल पेठेंचे वाचन आणि कोणाही व्यक्तीला आपल्या पोटात घेऊन लगेच आपलेसे करणारे क्रांती कानडे यांचे ‘घर’ – या तिघांनी मिळून आम्हा श्रोत्यांच्या बोथट झालेल्या संवेदनांची कलेवर आमच्या समोर टांगली. खरंच की – आपण किती यंत्रासारखं आयुष्य जगतो; घरांचे आकार, त्यांची मांडणी, त्यांना कुशीत घेणारी आजूबाजूची झाडे, घरांचे रंग, त्यांचे सभोवतालच्या निसर्गातील रंगांशी होणारे संवाद, खिडक्या, पुढील गवतावर खेळणारे सूर्यकिरण आणि ते पाहतांना घराच्या चेहऱ्यावर पडलेला समाधानाचा सोनेरी प्रकाश; आपण ज्यांना निर्जीव समजतो ती सर्व घरं जिवंत असून फक्त आपणच निर्जीव आहोत हे उमगलं. फार कमी प्रयोगांतून साक्षात्कार होतो. किमया हा त्यातला एक.
थोडक्यात, आपली घरं हि आपल्या ‘मी’ ची प्रतिबिंब आहेत. किमयाचा प्रयोग अनुभवून घरी आल्यावर केवळ माझे घर बघून मी स्वतःबद्दल खूप काही शिकलो. घराच्या भिंती, त्यांचे रंग, टापटीप किंवा अस्ताव्यस्तपणा; सर्व काही मला माझ्याबद्दल खूप काही सांगून गेले.
आपल्या सर्वांच्या आयुष्यात एखादा मंच असतोच. वक्त्याचा मंच म्हणजे तो जिथे व्यक्त होणार ते सभागृह; गायकाचा मंच म्हणजे तो ज्या ठिकाणी गाणे सादर करतो ती जागा; किंवा शिल्पकाराच्या मंच म्हणजे त्याचे शिल्प ज्या ठिकाणी विराजमान होणार ते स्थळ. परंतु आपण सपशेलपणे विसरतो कि वरील सर्व मंच हे व्यक्त होण्याचे आहेत आणि आपल्या सर्वांचा सृजनाचा मंच म्हणजे आपले घर. नाटकाच्या स्टेजवर कागदाचा एक चिटोरा देखील आपण खपवून घेत नाही पण घरात मात्र कपडे, पुस्तके, सामान, कागदपत्रे, जाळी-झळमट, सारे काही आलबेल. अलगदपणे श्रोत्याला पुरते कळून चुकते कि आपण आपल्याला सामावून घेणाऱ्या आपल्याच घरावर आणि आपल्या वस्तूंवर किती अन्याय करत आलो आहोत.
स्थापत्यशात्रातील काही किचकट संकल्पना या अभिवाचनातून फार सोप्या आणि जिवंत पद्धतीने उलगडल्या गेल्या. अशीच एक संकल्पना म्हणजे अवकाश, किंवा स्पेस. किंबहुना घर या संकल्पनेचा उगमच अवकाशाच्या संकल्पनेतून झाला असावा. नाही म्हंटले तरी आपण सर्वच ‘मी’ च्या जाणिवेने ओतप्रोत भरले आहोत. आपला हा तोकडा ‘मी’ अपरिमित अवकाशात कसा जगणार? म्हणून मग छोटी अथवा मोठी घरं. थोडक्यात, आपली घरं हि आपल्या ‘मी’ ची प्रतिबिंब आहेत. किमयाचा प्रयोग अनुभवून घरी आल्यावर केवळ माझे घर बघून मी स्वतःबद्दल खूप काही शिकलो. घराच्या भिंती, त्यांचे रंग, टापटीप किंवा अस्ताव्यस्तपणा; सर्व काही मला माझ्याबद्दल खूप काही सांगून गेले.
बिंदू, रेषा, अवकाश, प्रकाश, बाग, जलस्रोत अशा अनेक घटकांनी वास्तू साकारते. आणि हा प्रत्येक घटक म्हणजे जणू काही एक शास्त्र. रेषा एकत्र येऊन अवकाशाचा एक छोटा तुकडा कसा कापून वेगळा करतात हे एक शास्त्रच आहे. किंवा आचवलांनी पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे वास्तूच्या सभोवतीचे जलस्रोत तिला कसे एक प्रकारचा हलकेपणा आणि गतिमानपणा देतात; हे देखील एक शास्त्रच. विविध वस्तूंचे आणि घटकांचे योग्य परिमाण साधणं; हे देखील एक शास्त्रच आहे की! किमया अशा नानाविध शास्त्रांना उकलते आणि त्या किचकट शास्त्राचे रूपांतर कोणी अनुभवू अथवा जाणून घेऊ शकेल अशा एका बोलक्या भावनेत करते.
किमया चा एक तास घरात नाही मावणार इतकी श्रीमंती देऊन गेला. खरंच, स्थापत्यशास्त्रातून येणारी संवेदनशीलता आणि श्रीमंती हि घरात न मावणारी आहे. घराच्या दार-खिडक्यांतून बाहेर येऊन ती बाग आणि अंगण इथपर्यंतच न थांबता रस्ते, आजूबाजूच्या वस्त्या, नद्या, असा विस्तृत प्रवास करत प्रसरण पावते. आपण संपूर्ण अवकाशाचे आणि त्यातील सर्वच घटकांचे खूप मोठे गुन्हेगार आहोत हि जाणीव पाण्यात बनणाऱ्या बर्फासारखी आपल्या आत स्थिरावते.
एक प्रयोग म्हणून ‘किमया’त अनेक बाबींचा सखोल विचार झाला आहे. प्रयोगासाठी घरांची निवड फार काळजीपूर्वक केली जाते. प्रत्यक्ष प्रयोगाची तयारी सुरु होण्याच्या आधीपासूनच अतुल पेठे व त्यांचा संच वास्तू समजून घेतात, तिच्याशी संवाद साधतात. प्रयोगातील प्रकाशयोजना समर्पक असून नरेंद्र भिडे यांनी केलेले संगीत नियोजन नेटके व साजेसे आहे. वाचनातील निरनिराळ्या संकल्पना उलगडण्यासाठी केला गेलेला ‘प्रॉप्स’ चा वापर फार विचारपूर्वक करण्यात आला आहे. अनेक तरुणांनी हा प्रयोग साकारण्यास हातभार तर लावलाच आहे त्याचबरोबर प्रयोगादरम्यान देखील अनेक मदतीचे हात शांतपणे कार्यरत असतात.
‘किमया’ चे खरे यश कशात आहे? माझ्या मते, एका व्यक्तीला तिच्या घराबद्दल संवेदनशील करण्याच्या या प्रयोगाच्या अफाट ताकदीत त्याचे यश आहे. आज शहरे, त्यांचे नियोजन, रस्ते, वाहतूक, गावांना मिठी मारणारा भीतीदायक गलिच्छपणा, नाले झालेल्या नद्या, हे सर्व आपण जाणतोच. माणूस एकदा त्याच्या घराबाबत संवेदनशील झाला, कि त्याचा पुढचा प्रवास आपसूकच सुरु होतो. स्वतःचे घर नेटके करण्याची फुरसत, किंवा ओढ जोपर्यंत एखाद्या व्यक्तीत निर्माण होत नाही, तोपर्यंत तो आर्क्टिकवर वितळणाऱ्या बर्फाबाबत फक्त समाजमाध्यमांवर ‘शेयर’ करण्यापलीकडे काहीच करणार नाही. अगदी सरळ शब्दांत सांगायचे झाले, तर किमया फारच ‘ऍक्शनेबल ‘ आहे. त्यावर लगेच कृती करता येते. ‘किमया’चा एक प्रयोग त्या व्यक्तीला पहिल्या पायरीवर चढवतो- स्वतःच्या घराची. हि एक पायरी चढण्यातला आनंद इतका असीम आहे कि पुढच्या पायऱ्या ती व्यक्ती आपोआप चढणार. किमया हे केवळ एका पुस्तकाचे वाचन नसून ती मानवी संवेदनांची पुनर्मांडणी आहे. किमया व्यक्ती आणि समाजपरिवर्तनाचे चक्र आहे. ते नुकतेच फिरू लागले आहे. गतिमान होण्यास वेळ नाही लागणार!
किमयाचे अधिकाधिक प्रयोग होणं आवश्यक आहे; आपल्या व आपल्या पुढच्या पिढीसाठी आणि समाजाचे धागे टिकवून ठेवण्यासाठी ‘किमया’ एक आशेचा किरण आहे.
Leave a Reply