साधारण चार वर्षांपूर्वीची घटना. अनेक वर्षांनंतर माझा गाण्याचा कार्यक्रम होता. मी आठवीत असताना माझं गाणं शिकणं बंद झालं. दहावी, त्यानंतर बारावी आणि मग नंतर अभियांत्रिकीचं शिक्षण; या सर्व व्यापात गाणं तसं मागेच पडत गेलं. अभियांत्रिकीचं शिक्षण संपलं आणि मग सुरु झाली नोकरी. नोकरी चांगली असल्यामुळे आणि माझे वरिष्ठ फारच समजूतदार असल्यामुळे गाण्याचा घरीच थोडा थोडा रियाझ करायला वेळ मिळू लागला. एक- दोन वर्ष असंच सुरु होतं. दोन वर्षांनी मी राजीनामा दिला आणि अजून मन लावून रियाझ करण्यास सुरुवात केली.
कोणीतरी रियाझ ओझरता ऐकला आणि मेहफिल करणार का विचारलं. उथळ पाण्याला खळखळाट असतोच. अति-आत्मविश्वासाने मी लगेच होकार दिला. जोमाने तयारी सुरु केली. पुढचे वीस दिवस एकच राग. शेवटी कार्यक्रमाचा दिवस उजाडला. संध्याकाळी ६ वाजता गाणं सुरु झालं आणि आयुष्यात पहिल्यांदाच, मला धडकी भरली. आवाज थरथरू लागला. तानपुरा ऐकू येईनासा झाला आणि स्वर सापडेनासे झालेत. त्यादिवशी मी कशीबशी वेळ मारून नेली. एकंदर गाणे चांगले झाले आणि नंतर रंगले देखील परंतु, ‘या भीतीचा, या थरकापाचा उगम कुठे होतो?’ हा विचार अनेक वर्षे मनात होता. त्यानंतर अनेक कार्यक्रम झालेत, अनेक वेळा ते भय आणि तो थरकाप होता, अनेक वेळा तो नव्हता; थोड्या अनुभवाने हे कोडं आता उलगडू लागलं आहे. या विषयावरील झालेला थोडा विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
मला जर कोणी सांगितलं की समोरची बाग बघून ये आणि त्यात सुंदर काय आहे ते मला सांग, तर मला घाम फुटेल का? मग मला जर कोणी बुजुर्ग जाणकार व्यक्ती म्हणाली की अर्धा तास यमन ऐकवं, तर मग मला घाम का फुटतो? बागेत जाऊन तिथे काय अनुभवलं हे सांगणं आणि मनोविश्वात जाऊन तेथे काय अनुभवलं हे सांगणं या दोन प्रक्रिया सारख्या आहेत की वेगळ्या?
बागेत जाऊन ते सौंदर्य कोणाला सांगणं यात दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत. पहिली म्हणजे सौंदर्य अनुभवणं, संवेदनशील मनाने ते टिपणं. दुसरा टप्पा आहे मंथनाचा. जे सौंदर्य पाहिलं, ते मोजक्या पण परिमाणकारक शब्दांत, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, प्रेमाने कसं सांगणार?आणि खरंतर गायकाचं किंवा कलाकाराचं काम हे निश्चितच जास्त जिकिरीचे आहे. बागेत सौंदर्य आहेच. ती बाग कोणीतरी फ़ुलवूनच ठेवली आहे. आपलं काम फक्त ते सांगण्याचं आहे. गाण्यात मात्र ही सौंदर्य निर्मितीची प्रक्रिया कलाकाराला स्वतः करावी लागते. स्वतःच्या रियाजात, आयुष्यांतील अनुभवांत, जर हे सौंदर्य जाणवलंच नसेल तर ते व्यक्त कसं करता येणार? हे सौंदर्य आयुष्यात अनुभवलं नसेल आणि ते स्वरांच्या माध्यमातून मांडायची सवय नसेल, तर स्वरमंचावर आपण काय प्रस्तुती करणार? कुमार गंधर्व ‘देखो रे ऊत’ सारखी रचना करू शकले कारण की त्यांनी तेवढ्याच ताकतीचा अनुभव संवेदनशीलपणे अनुभवला होता. ही संवेदनशीलता नसेल, तर कलाकार नक्की त्याच्या श्रोत्यांना सांगणार तरी काय? तानांच्या फैरी झाडणं, बिना प्रयोजनाची आलापी करणं, खर्जापासून अति तयार षड्जाला जात श्रोत्यांच्या कानांत दडे बसवणं म्हणजे एखाद्याने कोणत्याही बागेत ना जात केवळ मनाच्या बाता मारण्यासारखे आहे.
दुसरी पायरी म्हणजे अनुभव सशक्तपणे मांडण्याची. एखादया कुशल स्थपतीशी चर्चा केली की लक्षात येतं की त्यांना वारा, प्रकाश, अवकाश यांचा इतका अनुभव असतो की कशी रचना केल्याने त्याचा तेथे राहणाऱ्या किंवा येणाऱ्या लोकांच्या मनावर काय परिणाम होणार हे त्यांना क्षणांत उमगतं. तसंच, कुशल गायकाची स्वर, राग, भाव, यांच्यावर इतकी पकड असते की कशी रचना केल्याने काय परिणाम साध्य होणार हे त्यांना चांगलेच ठाऊक असते. इथे वर्तुळ पूर्ण होते. सौंदर्य अनुभवलं आहे आणि ते व्यक्त करण्याच्या माध्यमावर देखील पूर्ण प्रभुत्व आहे. सिद्धहस्त कलाकारांकडे या दोन्ही गोष्टी मुबलकतेत असतात.
यातली एखादी एक जरी बाजू कमकुवत असली, तर कलाकाराच्या मनोवृत्तीनुसार खालील शक्यता होऊ शकतात –
अनेक कलाकारांचं गाणं इन्फॉर्मल किंवा घरगुती वातावरणात फारच खुलतं परंतु मोठ्या मंचावर काहीतरी गडबड होते. अशा कलाकारांनी खूप सौंदर्य अनुभवलं असतं आणि त्यांच्या माध्यमावर देखील त्यांची हुकूमत असते परंतु मोठ्या मंचावर काहीतरी बिनसतं – दडपण येतं, मनातील बागेत शिरण्यास अटकाव होतो, ध्वनी व्यवस्था हवी तशी नसते त्यामुळे घरगुती गाण्यात जी रंगत येते ती मोठ्या मंचावर येत नाही; जर सर्व काही मनासारखं असेल तर मात्र मोठ्या मंचावर देखील तोच अनुभव मिळतो.
अनेक कलाकार सुरात असतात, तयारी छान असते परंतु त्यांचं गाणं ऐकून काहीच वाटत नाही, ते मनाला भिडत नाही. अशा कलाकारांची बहुदा मांडणीच्या कौशल्यावर हुकूमत असावी परंतु संवेदनशीलता कमी असल्यामुळे फारसे सौंदर्य किंवा अनुभव त्यांच्याकडून टिपल्या गेले नसावेत.
काही कलाकार असे असतात की त्यांनी सौंदर्य प्रचंड अनुभवलं असतं परंतु ते मांडण्यासाठी जी काही तयारी आणि मनोवृत्ती लागते, ती त्यांची नसते. अशा कलाकारांचं गाणं सामान्य श्रोत्यांना फारसं आवडत नाही परंतु जाणकार लोकं सतत त्यांच्याभोवती घोळका घालून असतात.
सौंदर्याची गाढी अनुभूती आणि मांडणीवर हुकूमत असणारा कलाकार खरं तर लाखात एक!
आणि सर्वात महत्वाचं – काही विरळ कलाकार असे देखील असतात की त्यांचं गाणं (अनुभूती आणि मांडणी) ही फार वरच्या दर्जाची असते परंतु ते सतत मांडणीच्या आणि संवेदनशीलतेच्या अधिकाधिक खोलीत उतरत जातात. गाणं कितीही चांगलं झालं, तरीदेखील पुढची पायरी त्यांना खुणावत असते. त्यामुळे, सर्व काही उत्तम असून देखील ते लोकांसमोर गाणं टाळतात किंवा त्यांना ते फारसं जमत देखील नाही.
या सर्व विचाराअंती असं लक्षात येतं की कलाकार आणि त्याच्या आतील थरकाप आणि भय यांचं नातं फारच गमतीशीर आहे. हे भय कलाकाराला नकोस वाटतं परंतु या भयाच्या सावलीतच कलाकार मोठा होतो. खरंतर हे भय आपल्याला सांगत असतं कि सौंदर्याची अनुभूती आणि मांडणीवरील हुकूमत अजून परिपक्वतेला पोहोचले नाही आहेत. या भयाला चिरडून टाकणे फार सोपे आहे. या भयाला चिरडून, अति आत्मविश्वासाने बेसूर आणि निरस गाणं लोकांसमोर मांडणाऱ्या कलाकारांची कमी नाही.

या भयाच्या ओझाखाली घुटमळून लयास देखील अनेक कलाकार गेले आहेत. हे भय जोपासून, त्याच्या हातात हात देऊन आणि योग्य वेळी त्याला तात्पुरतं बाजूला करू शकतो तो सिद्ध कलाकार!
Leave a Reply