आपण आपल्या आत एक ‘कर्ता’ निर्माण केला आहे . तो कर्ता म्हणजे ‘मी’. मी चिडलो आहे, मला हे येत नाही, मी बदलायला हवं, मी माझा चिडचिडेपणा कमी करायला हवा, मला अजून आनंदी व्हायचं आहे….. अशा अनेक प्रकारे रोज आपण या ‘मी’ ला संबोधत असतो. आपल्यातील हा ‘मी’ म्हणजे नक्की कोण? या ‘मी’चे नक्की अस्तित्व कुठे आहे? आत्मा म्हणतात, तो हा ‘मी’ का? जे. कृष्णमूर्तींचं या ‘मी’ बद्दलचे चिंतन अभ्यासण्यासारखं आणि त्यावर विचार करून ते पूर्णपणे समजून घेण्यासारखं आहे.

आपल्या आयुष्यातील सर्वच गोष्टी, घटना, भावना, अनुभव आणि जाणीवा या ‘मी’च्या सभोवताली फिरत असतात परंतु बोट ठेवून ‘मी’ कुठे आहे, हे आपण सांगू नाही शकत. आपल्यातील हे ‘मी’ म्हणजे जणू काही एक केंद्र आहे. जे काही मी अनुभवतो, ते चांगलं कि वाईट हे ‘मी’ ठरवतो. आपल्यातील काही गोष्टी चांगल्या नाहीत हे देखील या ‘मी’ ला कळतं आणि ‘हे बदलायला हवं’ असं देखील हा ‘मी’ आपल्याला सांगतो.

आपल्यातील ‘मी’ जर इतका प्रबळ आहे, तर आपल्याला हवे ते सर्व बदल आपल्यात घडून का नाही येत? आपण स्वार्थी, हिंसक, चिडचिडे, अप्पलपोटी का वागतो? कृष्णमूर्ती म्हणतात कि आपण ‘मी’ कडे उत्तर म्हणून किंवा कर्ता म्हणून पाहतो पण प्रत्यक्षात, ‘मी’ हा आपल्या प्रश्नांचाच एक भाग आहे. अगदी सध्या भाषेत सांगायचे झाल्यास, ‘मी’ हा देखील एक विचार आहे. त्याला विचारांव्यतिरिक्त वेगळे अस्तिव नाही. आपल्यातील सर्व विचारांनी काळाच्या ओघात निर्माण केलेले ते एक केंद्र आहे. ती एक गाठ आहे. विचारांची, भावनांची, आकांक्षांची, भयांची…..

मी म्हणजे आपले विचार, आठवणी, अनुभव, भय, भावना, आकांक्षा या सर्वांची गोळाबेरीज. विचार, अनुभव, आठवणी, भय, भावना या सर्व गोष्टी भूतकाळातील आहे. ‘मी’ द्वारे आपण त्यांना सतत तेवत ठेवत असतो आणि म्हणूनच आपण वर्तमानात जगू नाही शकत.

‘मला राग आला आहे’ असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा ‘मी’ आणि माझा ‘राग’ या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे आपण गृहीत धरतो. कृष्णमूर्ती म्हणतात, ‘मला राग आला आहे’ हे विधान फसवे आहे. खरंतर, ‘मी राग आहे’ हे खरे विधान आहे. जेव्हा मी मला आणि माझ्या रागाला वेगळं म्हणतो, तेव्हा साहजिकच ‘मी’ त्या रागाबद्दल काहीतरी करावे अशी अपेक्षा निर्माण होते. म्हणजेच, ‘मी’ आणि माझा राग हे दोन मुळात एकच असलेले तत्व एकमेकांशी भांडू लागतात. या भांडणात कोणीही जिंकलं तरीदेखील आपली हारच होणार. मी माझ्या रागावर नियंत्रण मिळवणं म्हणजे एकप्रकारे मीच बादलीत बसून बादली उचलण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.

‘मी’ या संकल्पनेला अस्तित्वच नाही, हि जाणीव जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आपले सर्व आयुष्य संघर्षातच जाणार. आपलीच शक्ती आपल्याच शक्तींशी भांडणार आणि शेवटी आपण झिजून जाणार.

हि समस्या जरी बिकट वाटत असली, तरीदेखील यावरील उपाय तसा सोपा आहे. बुद्धीला पटायला सोपा, परंतु आचरणात आणायला कठीण. मला राग आला आहे असं न म्हणता ‘मी राग आहे’ हे जेव्हा उमगतं, तेव्हा त्या रागाचा स्वीकार करण्यावाचून दुसरे काही गत्यंतरच राहत नाही. या स्वीकृतीतूनच त्या रागात अडकलेली ऊर्जा मोकळी होते आणि राग गळून पडतो.

Share this: