Categories
Uncategorized

संत साहित्याच्यी कालाबाधितता


काल मला आणि दाक्षायणीला पुण्यातील वाडिया महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी ‘संत साहित्य – एक साठवण’ या विषयावर संवाद साधण्यासाठी बोलावले होते. थोडं बोलणं आणि थोडं गाणं असं कार्यक्रमाचं स्वरूप होतं. आजच्या काळातही संत साहित्य ताजं आणि उपयुक्त का आहे? या विषयावर तुम्ही नक्की बोला असं त्यांच्या प्राध्यापकांनी सुचविलं.

संत साहित्य कालातीत का आहे? याला अनेक कारणे आहेत आणि यातील सर्वांत महत्वाचे कारण म्हणजे संत साहित्यातील ‘फॉर्म’ आणि ‘फंक्शन’ यांचे संतुलन. फंक्शन म्हणजे ते मुख्य काम जे करण्यासाठी एखादी गोष्ट बनविण्यात आले आहे. उदाहरणार्थ, अंग झाकणे आणि प्रतिकूल पर्यावरणापासून संरक्षण करणे हे कपड्यांचे फंक्शन. फॉर्म म्हणजे त्या वस्तूचे दार्शनिक रूप. कपड्यावरील चित्र, जरी, नक्षी म्हणजे फॉर्म.

संत साहित्यात ‘फॉर्म’ हा अगदी गरजेएवढा आणि नेटका असतो. संतांना जे सार सांगायचे आहे, ते सार स्पष्टपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक तेवढाच तो असतो. त्यात गरज नसताना अलंकार वापरले नाही आहेत. गम्मत अशी, जशा लोकांच्या आवडी बदलत जातात, तसा त्यांना आवडणारा फॉर्म बदलत जातो. २० वर्षांपूर्वीची चित्रपटाची गाणी आजच्या पिढीला आवडत नाहीत. यामागचे कारण फार सोपे आहे. त्यांचा फॉर्म आजच्या पिढीला जो फॉर्म आवडतो त्यापेक्षा फार वेगळा आहे. संतांनी त्यांच्या वाणीत लोकांना ‘खेचण्यासाठी’ फॉर्म चा वापर नाही केला. त्यातील सार हे फार उच्च दर्जाचे आहे आणि म्हणून ते कालातीत आहे. अनेक लेखक, कवी हे त्यांच्या काळातील समाजाला रुचेल किंवा आकर्षित करेल असे लिहितात. संतांनी अतिशय सध्या आणि परखड भाषेत सत्य लोकांसमोर मांडलं.

आपण कितीही उत्क्रांत झालो असलो, तरीदेखील हा ओंगळपणा तसाच आहे आणि संत साहित्य नेमके त्या ओंगळपणावर बोट ठेवते.

आपण सर्वच मानवाच्या उत्क्रांतीबद्दल जाणतोच. परंतु जे. कृष्णमुर्ती याबाबतीत फार सुंदर बोलायचे. ते म्हणायचे, कि उत्क्रांती हि फक्त शरीराची आणि बाह्य गोष्टींची झाली आहे. आपल्या मनातील हिंसा, राग, भावना इत्यादी शेकडो वर्षांपूर्वी होत्या तशाच आजही आहेत. दोनशे वर्षांपूर्वी माणूस प्रसिद्धीसाठी जितका हपापलेला होता, तेवढाच आज देखील आहे. संत साहित्य काळाच्या बदलापासून अबाधित आहे कारण कि ते या मूळ मानवी मनावर आणि त्यातील ओंगळपणावर भाष्य करते. आपण कितीही उत्क्रांत झालो असलो, तरीदेखील हा ओंगळपणा तसाच आहे आणि संत साहित्य नेमके त्या ओंगळपणावर बोट ठेवते.

आपण कितीही झाकायचा प्रयत्न केला, तरीदेखील आपल्यातील कोतेपणा आणि त्यामुळे आपल्याला आणि आपल्या आजू-बाजूच्यांना होणारा त्रास आपण उघड डोळ्यांनी बघत असतो, त्यापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतो. संत साहित्य हा त्या दिशेत मार्गक्रमण करण्यासाठी एक आश्वासक मदतीचा हात म्हणून उभे राहते. हेच त्याच्या कालातीततेचे रहस्य.

By Mandar Karanjkar

Mandar Karanjkar is author, motivational speaker and consultant based in Pune. Mandar works with handful of organizations helping them with strategy, communication and culture. Mandar is trained in Indian Classical Music over a decade. He is a classical singer and flute player.

Mandar has written columns for many reputed newspapers. Engineer by profession, he conducts workshops and delivers talks on subjects as wide as strategy, innovation, online marketing, spirituality, Kabir, Zen etc.

Mandar is a published author.

Leave a Reply