अनेकांच्या आग्रहाला बळी पडून शेवटी ‘कट्यार’ पाहिला. त्याहून अधिक अनेकांच्या आग्रहाला बळी पडून हा रीविव लिहितो आहे. जुन्या ‘कट्यार काळजात घुसली’ ला परत नवीन स्वरूपात लोकांसमोर घेऊन येणे हा स्तुत्य उपक्रम आहे हे आधीच नमूद करतो (आभार प्रदर्शन मेन शो च्या आधी करण्याची हल्ली पध्दत आहेच!). या उपक्रमामुळे अनेक तरुण श्रोते नाट्य संगीत अन शास्त्रीय संगीताकडे वळतील अशी आशा आहे. पुढेही असे प्रयोग होत राहावेत; पण काही बाबींचा उल्लेख करणे फारच गरजेचे वाटते. काहींना त्या पटतील आणि काहींना नाही. आपण सर्वच tolerant असल्यामुळे तुम्ही निदान त्या समजायचा प्रयत्न कराल हि आशा.
हा रिवीव लिहायचं अजून एक कारण म्हणजे, सिनेमा बघून अनेकांचा सिनेमातील संगीत म्हणजे शास्त्रीय संगीत आहे असा समज होतो आहे किंवा खासाहेबांची किंवा पंडितजींची गायकी म्हणजे घरंदाज गायकी असा गैरसमज होतो आहे. या सर्वांपर्यंत शास्त्रीय संगीताचा गंध देखील कट्यार बघून उमजणार नाही हा निरोप पोहोचणे गरजेचे आहे. काळजीची बाब म्हणजे, कट्यार मधून श्रोत्यांना शास्त्रीय संगीत आणि चांगले संगीत म्हणजे काय? या प्रश्नाचे चुकीचे उत्तर पोहोचते. उदाहरण द्यायचे झाल्यास, सदाशिव जेव्हा खासाहेबांची गायकी चोरून ऐकण्यासाठी दर्ग्यात जातो (आता हा पण एक मोठ्ठा घोटाळा आहे. खासाहेबांची खरी गायकी फार वेगळी आहे आणि दर्ग्यात जाउन ते काहीतरी भलतच गातात. ती ना तर धड कव्वाली आहे न धड घरंदाज गायकी. कदाचित सदाशिव ऐकायला येईल हे त्यांना माहित असणार आणि त्यामुळे ते ठरवून अस काहीतरी गातात. असो.) तेव्हा त्यांच्यात कोण श्रेष्ठ हे सिद्ध करण्यासाठी स्पर्धा लागते. दोघेही गायक अधिकाधिक वेगाने ताना मारायचा प्रयत्न करतात. संगीताच्या जाणकारांसाठी प्रश्न- तानांच्या गतीवरून गायकाची थोरवी ठरवता येते काहो? शास्त्रीय संगीत म्हणजे गळ्याने केलेली कसरत नाही आहे. खरतर या सर्व कसरतींमुळे संगीताचा गाभ्याला इजा पोहोचते. हीच चूक काजव्यांची पकडा-पकडी खेळताना होते.
शास्त्रीय संगीत गाउन काजवे बोलविता येतात का? कदाचित येऊ शकतात. आपण असे गृहीत धरुयात कि ते येतात. परंतु, शंकर महादेवन जशी सरगम गायला आहे ना, ती ऐकून आलेले काजवे पळतील. शास्त्रीय संगीतात अमाप जादू आहे. पिक्चर हि बाब श्रोत्यांपर्यंत पोहोचवतो देखिल. परंतु, हि जादू नेमकी कशात आहे हे दाखवताना मोठी गफलत करण्यात आली आहे असे माझे मत!
अजून एक खटकणारी गोष्ट म्हणजे, खासाहेब आणि त्यांचे शागीर्द उभे राहून रियाझ का करताना दाखविले आहेत? त्या काळात कुठलेही खासाहेब उभे राहून रियाझ करणे केवळ अशक्यच आहे. खासाहेब घराण्याचे नाव बदनाम झाल्यामुळे रावणासारखे जळतात. तेच खासाहेब घराण्याची तालीम विसरून, आपल्या शिष्यांसोबत उभे राहून रियाझ कसा करतील?
सर्वाधिक खटकतो तो चित्रपटाचा शेवट. सदाशिवाचे गाणे खासाहेबांना आणि त्यांच्या इगो ला कट्यारीसारखे कापते असे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आले. यासाठी वापरण्यात आलेला तराना मात्र फारच उथळ वाटतो. तो ऐकून पहिल्यांदा शास्त्रीय संगीत ऐकणारा एखादा नवखा भाळून जाऊ शकतो, पण अनेक किंवा काही वर्षे शास्त्रीय संगीताचा अभ्यास केलेला जाणकार नाही. खासाहेबांचा इगो खरतरं हे गाणं ऐकून अजून वाढायला हवा.
इथे जरा गंभीर होण्याची गरज आहे. कलाकाराचा गर्व कधी गळून पडतो? जेव्हा कलाकाराला गाण्यातून त्याचं स्वतःच ज्ञान आणि विद्वत्ता किती तोकडी आहे हे कळते त्यातून. सदाशिव गातो, गाता-गाता तो स्वतःच स्वतःच्या गाण्यातून मिटून जातो आणि तेथे मग अमाप दिव्यत्वाची प्रचीती येते. सदाशिव भारून जातो आणि सदाशिवाची हि अवस्था खासाहेबांना त्यांच्या गाण्यात ते आणि त्यांचा गर्व आहे आणि त्यामुळे त्यात ईश्वरी साज नाही याची जाणीव करून देते. खासाहेबांचा गर्व केवळ याच पद्धतीने गळू शकतो. सिनेमामध्ये मात्र सदाशिव त्याच्या गाण्यातून मिटत नाही; उलट तो अधिकाधिक ठळक होत जातो. खासाहेबांचा गर्व गळून का पडला? असा मोठा प्रेक्षकाच्या प्रश्न पाठीस लटकून रहतो.
कट्यार सिनेमा म्हणून यशस्वी होईल आणि होतो आहेच. या प्रयत्नाची स्तुती करायलाच हवी. अभिजात संगीत हे तरुण श्रोत्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहेच. परंतु, काही गोष्टी केवळ श्रोत्यांना भुरळ पडावी म्हणून टाकण्यात आल्या आहेत आणि त्यामुळे अत्यंत चुकीचा समज पसरतो आहे. हे कदाचित टाळता येऊ शकले असते.
कट्यार काळजात नाही घुसली. उलट, तिची बोथट धार त्याला उगाच जखम करून गेली. शास्त्रीय संगीताला glamour देऊन त्याचे खरे स्वरूप लोकांपर्यंत पोहोचवणे शक्य नाही. जेव्हा glamour, प्रसिद्धी, आवेग, उन्मेष आणि गर्व गळून पडतो, तेव्हाच अभिजात संगीत म्हणजे काय हे कोडे उलगडू लागते. कट्यार मध्ये संगीताचा अभिजातपणा अजिबातच दिसला नाही. एखाद्या जुन्या प्रशस्त वाड्याची उरली-सुरली फळकुट गोळा करून, त्याला चित्र-विचित्र रंग मारून, सिंथेटिकचे बटबटीत पडदे लावून त्यातला अभिजातपणा पुनरुज्जीवित करता येत नाही, याची प्रचीती आली
Leave a Reply